- आरटीओकडून इच्छुकांना नाव नोंदणीचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०२१) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा जाहीर ई – लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे १२ ऑक्टोबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.
वाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, व्हॅन या वाहनाचा समावेश आहे. ई – लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसीलदार पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- पिंपरी चिंचवड यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.
या जाहीर ई – लिलावात सहभागी होण्यासाठी १ ते ६ ऑक्टोबर २०२१ कालावधीमध्ये www. eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाइन नाव नोंदणी झाल्यानंतर १ ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी पाच हजार रकमेचा डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड या नावे अनामत रकमेचा धनाकर्षा सह ऑनलाइन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व मान्यतेसाठी सादर करणे गरजेचे आहे.
















