- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु कोड बिल आणले, नदीजोड प्रकल्प आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले. बाबासाहेबांच्या कार्याची उभ्या विश्वात ख्याती आहे. हे आपल्या भारताचे मोठेपण असल्याची भावना पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांनी व्यक्त केली.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून काटे यांनी अभिवादन केले. यावेळी शाळेच्या प्राचार्या सुषमा उपाध्ये, पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख पलक गांधी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काटे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांचे हीत साधण्यासाठी कायद्यात समान तरतूद केली. त्यामुळे आज उभ्या देशातील नागरिकांना अधिकार प्राप्त झाले. त्यांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे सामान्यातल्या सामान्य नागरिकाला देखील आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. बाबासाहेबांच्या कार्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांच्या अचाट कार्यापासून धडे घेणारा माणूस जीवनात कधीच अयशस्वी ठरणार नाही, एवढी ताकद बाबासाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये आहे, असेही काटे यांनी म्हटले आहे.