न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२२) :- महापालिका सर्वसाधारण सभेची आणि स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. यामध्ये विविध विकासकामांसाठी होणा-या सुमारे ७ कोटी ४३ लाख ९८ हजार रुपयांच्या खर्चाचा समावेश होता.
प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. मंजूर केलेल्या विषयांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग, बी.आर.टी. रोड व १८ मीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे, शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांमधील जलपर्णी काढणे, ताथवडे व वाकड परिसरातील नव्याने विकसित होणा-या डी.पी. रस्त्यावरील विद्युत विषयक कामे करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील जुन्या लिफ्ट बदलून नव्याने लिफ्ट बसविणे, महापालिका शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्पासाठी इंटरनेट बॅ॑डविड्थ सेवा उपलब्ध करून देणे तसेच तरतूद वर्गीकरण करणे इत्यादी विषयांचा समावेश आहे.
















