न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागा ठेवण्यात येतात. आरटीई प्रवेशासाठी ४ एप्रिल रोजी सोडत काढली होती. त्यामध्ये शहरातील ३२५५ मुलांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली. मात्र कागदपत्रे पडताळणीत अडचणी आल्याने शहरात केवळ ६० टक्के विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने प्रवेशाची मुदत १० मेपर्यंत वाढवली आहे.
आरटीईअंतर्गत लॉटरीनंतर मोफत प्रवेशासाठी शाळा निश्चित करण्याची मुदत २० एप्रिल होती. शहरात २० एप्रिलपर्यंत केवळ ७२५ जणांचेच प्रवेश झाले होते. तसेच राज्यभरातूनही खूप कमी प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे प्रवेशासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यानंतरही पिंपरी – चिंचवड शहरातील अजून ४० टक्के जागा रिक्त असल्याचेसमोर आले आहे. त्यामुळे १० मेपर्यंत प्रवेशासाठी आणखी ११ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. याकालावधीत कागदपत्रांची पडताळणी आणि शाळा प्रवेश दोन्ही प्रक्रिया कराव्या लागणार आहेत.
तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या बालकांची नावे कागदपत्र पडताळणीमध्ये रद्द झाली. तसेच संबंधित शाळेत बालकाचा प्रवेश निश्चित न झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अनेक पालकांचे अर्ज निवासी पुराव्यामुळे अपात्र झाले आहेत. परिणामी निवासी पुराव्यामध्ये शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत. यात आता निवासी पुरावा म्हणून ११ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. परिणामी, अनेक पालकांना प्रवेशासाठी दिलासा मिळाला आहे.