- ओला व सुका कचऱ्याचे जागेवरच वर्गीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- शहरातील घनकचऱ्याचे योग्यरीतीने व्यवस्थापन होण्यासाठी इंदूरच्या धर्तीवर भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक आणि पिंपरीनगर स्मशानभूमीजवळील पंपिंग स्टेशन या ठिकाणी कचरा स्थानांतर केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या – त्या भागातील ओला व सुका कचरा एकाच ठिकाणी गोळा करून वर्गीकरणानुसार मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. या कामासाठी ९ कोटी ४४ लाख रुपये खर्च होणार आहे.
उद्योगनगरीत दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मोशी कचरा डेपो येथे ८१ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे २५ ते ३० ठिकाणी रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातून गोळा करत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर, हवेचे प्रदूषणही होते. हे टाळण्यासाठी महापालिकेने इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्तांच्या १७ सप्टेंबर २०२१ रोजीच्या कासारवाडी मान्य प्रस्तावानुसार मैलाशुद्धीकरण प्रकल्प, थेरगाव येथील एम. एम. शाळेजवळील स्मशानभुमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर २३ निगडीतील गायरान जागा, भोसरी- नेहरुनगर एमआयडीसी जे ब्लॉकमधील मोकळी जागा या ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे. या कामासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. व्यतिरिक्त क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक येथील कचरा स्थानांतर केंद्र व इंडस्ट्रियल रिकव्हरी फॅसिलीटी तसेच पिंपरीनगर स्मशानभूमीजवळील पंपिंग स्टेशन या ठिकाणी कचरा स्थानांतर केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी ‘ मेकनाईज्ड वेस्ट ट्रान्स्फर ‘ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
प्रकल्प सल्लागार टंडन अर्बन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कामांतर्गत आवश्यक मेकॅनिकल उपकरणे व विद्युत विषयक बाबींचे अंदाजपत्रक २०१८ -१९ ची दरसुची आणि पालिकेचे मंजूरदर पृथक्करणानुसार बनविण्यात आले. दोन ट्रान्स्फर स्टेशनसाठी भांडवली खर्च, जीएसटी व इतर शुल्क वगळून सुमारे ९ कोटी ४४ लाख ३९ हजार रुपये इतका येत आहे. या कामाचे चालन, देखभाल दुरुस्तीचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.
हे ट्रान्स्फर स्टेशन उभारल्यामुळे त्या – त्या भागातील ओला व सुका कचरा एकाच ठिकाणी गोळा करून वर्गीकरणानुसार ओला व सुका कचरा कॉम्पैक्ट करून हक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल. इंधनबचत होईल. हवेचे प्रदूषण कमी होईल.