- सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया; पालिका आयुक्तांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराला फाईव्ह स्टारनंतर आता ‘सेव्हन स्टार रेटिंग’ देत असल्याची स्वयंघोषणा महापालिकेने केली आहे. महापालिका शहर कचरामुक्त, हगणदारीमुक्त (ओडीएफ फ्री) तसेच, सांडपाणी प्रक्रियेसारखे सर्व नियम पूर्ण करत असल्याचा दावा करत हा ‘सेव्हन स्टार रेटिंग’चा प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. १) मंजूर केला आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत शहरे हगणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे या बाबींचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिका सहभागी झाली आहे. सर्वेक्षणातील नियमावलीनुसार पालिकेने स्वच्छता अभियानासाठी स्टार रेटिंग जाहीर करणे आवश्यक आहे. यापूर्वी पालिकेने फाईव्ह स्टार रेटिंग जाहीर केले होते. त्यानंतर आता ओडीएफ प्लस प्लस व वॉटर प्लस, कचरामुक्त शहर म्हणून सेव्हन स्टार रेटिंग केंद्र शासनाच्या कार्यपध्दतीनुसार जाहिर केले जाहीर केले जाणार आहे.
यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १५ दिवसांत मागवून नंतर सेव्हन स्टार रेटिंगबाबत स्वयंघोषणा केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर सेव्हन स्टार रेटिंगसाठीचे सर्व नियम पूर्ण करीत आहे. त्यामुळे सेव्हन स्टार रेटिंगबाबत स्वयंघोषणा करण्याचा प्रस्ताव आयुक्त सिंह यांनी मंजूर केला.
सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जात असल्याचा दावा…
शहरातील घरोघरी कचरा कचऱ्याचे वर्गीकरण संकलन, कचरा वाहतूक व प्रक्रिया, गटर, नाले व सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छता अॅपचा वापर, प्लास्टिक बंदी, तसेच मेकॅनिकल कंपोस्ट प्लांट, बायोगॅस प्लांट, प्लास्टिक टू फ्युअल प्लांट आदी बाबींचा शहरात अंतर्भाव आहे. शहरातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालये स्वच्छ व सुस्थितीत आहेत. भुयारी गटारे, ड्रेनेजलाइन सुस्थितीत आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून सर्व सांडपाणी पर्यावरणात सोडण्यापूर्वी नियमानुसार १०० टक्के सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. शहर पातळीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून किमान २५ टक्के पाण्याचा पुनर्वापर केला जातो. हे दावे करत पालिका स्टार रेटिंग जाहीर करत आहे. यासंदर्भात नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.
















