- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सायंकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२३ दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजता संपन्न होणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. भीमराव यशवंत आंबेडकर यांना या प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमास विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी संपन्न होणा-या या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, महेश लांडगे, अश्विनी जगताप तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.
विचार प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, संयोजक उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कनिष्ठ अभियंता विजय कांबळे, चंद्रकांत पाटील, राजदीप तायडे हे नियोजनाचे काम पाहत आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता शाहीर शितल साठे आणि सचिन माळी यांचे “नवयान महाजलसा” या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाची सुरुवात होईल. सकाळी साडे दहा वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तसेच सकाळी पावणे अकरा वाजता पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी साडे अकरा वाजता कुमार आहेर यांचा ‘मी जोतीराव फुले बोलतोय” या एकपात्री नाट्यप्रयोग होईल. दुपारी साडे बारा वाजता महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता ख्यातनाम गायक राहुल शिंदे आणि विजय सरतापे यांचा गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता राहुल कांबळे यांचा महामानवांच्या गीतांचा अनोखा नजराना पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता “महामानवांना अभिप्रेत समतावादी समाज व्यवस्था आणि चित्रपट माध्यमांची भूमिका” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव, साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल हे मान्यवर सहभागी असणार आहेत. सायंकाळी ७ वाजता डॉ. किशोर वाघ यांचे “वामनाचा जत्था” हा परिवर्तनवादी विचारधारेवर आधारित समाजप्रबोधन कार्यक्रम होणार असून रात्री साडे आठ वाजता मैना कोकाटे यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल.
बुधवार दि. १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता स्थानिक कलावंतांचा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडे अकरा वाजता व्याख्याते तथा युवा वक्ते नागेश गवळी यांचे “शिव-फुले-शाहू आंबेडकरांचा क्रांतिकारी लढा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ज्येष्ठ गायक विष्णू शिंदे यांचा तर दुपारी २ वाजता सुप्रसिद्ध गायक सुयोग केदार आणि अश्विन निरभवणे यांचा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता साहित्यिक डॉ. वामन गवई, जर्मनीतील भारतीय राजदूत सुयश चव्हाण, जेएनयु दिल्ली येथील डॉ. मिलिंद एकनाथ आव्हाड, दिल्ली विद्यापीठाचे प्रा.लक्ष्मण यादव यांचा सहभाग असलेले “रुपयाची समस्या – एक असंबोधित आर्थिक प्रश्न” या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. अविनाश नाईक व सहकारी यांचे “यशोगाथा महासूर्याची” हा कार्यक्रम सादर होणार आहे. रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध गायक राहुल अन्वीकर यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम होईल.
गुरुवार दि. १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता स्थानिक कलावंतांचा आणि ११:३० वाजता सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे आणि मुन्ना भालेराव यांचे गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता झी युवा फेम गायक चेतन लोखंडे, मंजुषा शिंदे, शेखर गायकवाड, स्वप्निल पवार यांचे “जल्लोष भीमरायाचा” हा संगीतमय कार्यक्रम तर दुपारी ३ वाजता शायर माजीद देवंबदी(दिल्ली), शायर वारीस वारसी(मेरठ), शायर शरफ नैन पारवी (उत्तरप्रदेश), मोईन शादाब(नवी दिल्ली), अनंत राऊत, नारायण पुरी(महाराष्ट्र) आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी कालेनंद यांचा “काव्यशायराना” हा कविता आणि शायरीच्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा गझलांचा कार्यक्रम तर सायंकाळी साडे सहा वाजता सार्थक शिंदे, दर्शन जावळे, क्रांती शिंदे, उन्नती रायते, चेतना इंगळे, सृजना भगवान सरवदे(सातारा) यांचे “हम भीमके दिवाने” हा गणेश शिंदे कला अकादमी प्रस्तुत लिटील चॅम्प्स कलाकारांच्या कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पावणे सहा वाजता बाळू साळवे यांचे माऊथ ऑर्गन वाद्य सादरीकरणातून महामानवांना अभिवादन होईल. त्यानंतर ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार, १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागसेनदादा सावदेकर, कुणाल वराळे, प्रांजल बोधक आणि लक्ष्मी लहाने यांच्या उपस्थितीत धम्मपहाट, सकाळी ८ वाजता शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता महापालिका भवन, पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह पुष्पहार अर्पण करणार आहे. तसेच सकाळी ९:१५ वाजता पिंपरी येथे, ९:३० वाजता एचए कॉलनी येथे तर ९:४५ वाजता दापोडी या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी ९:१५ वाजता काजल कोथळीकार यांचे “ऐका मी रमाई बोलते” हा एकपात्री प्रयोग, सकाळी १० वाजता भारतीय बौध्द महासभा आयोजित वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना, सकाळी १०:३० वाजता एकता कर्मचारी संघटनेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी १०:४० वाजता पुरस्कार व गुणगौरव सोहळा, सकाळी १०:५० वाजता आदिवासी कालानृत्यातून महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी १२:३० वाजता सुप्रसिद्ध गायिका रागिणी-रोहिणी बोदडे यांचा गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन, दुपारी २ वाजता बालप्रबोधनकार सप्तखंजिरीवादक तुलसी हिरवे यांचा कीर्तनातून प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३:३० वाजता ख्यातनाम व्हायोलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांचे “कलर्स ऑफ व्हायोलीन” हा संगीतमय कार्यक्रम आणि सँड आर्टिस्ट प्रसाद सोनवणे आणि चित्रकार सुमेध कल्हाळीकर यांच्या कलेतून सँड आर्ट व चित्राद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता सिनेपार्श्वगायक झुंड फेम विपीन तातड आणि स्वप्नील गणवीर, श्रावस्ती मोहिते, मंगेश इंगोले आणि बाल रॅपर स्वरूप डांगळे यांचे रॅपसॉंग, सायंकाळी ७ वाजता ख्यातनाम गायक अनिरुद्ध वनकर यांचे “वादळवारा” हा गीतगायनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता साजन बेंद्रे, विशाल चव्हाण आणि अभिषेक राजे यांचा “महासंगीताचा कलाविष्कार” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १० वाजता सुप्रसिद्ध गायक विशाल ओव्हाळ आणि धिरज वानखेडे तर १२ वाजता सुप्रसिध्द गायक धम्मानंद शिरसाठ आणि गायिका संगीत विशारद प्रज्ञा इंगळे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता “कशाला मागं सरायचं “हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. एच.ए. मैदान, पिंपरी येथे शनिवार, १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डॉ.गणेश चंदनशिवे आणि चेतन चोपडे यांचे “तुझ्या पाऊल खुणा..” हा महासंगीताचा आंबेडकरी जलसा तर सायंकाळी ६ वाजता जतीन पाटील दिग्दर्शित “क्रांतिसूर्य” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि बानाई (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स) यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ एप्रिल २०२३ दरम्यान बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजगता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दि. २१ एप्रिल रोजी “भव्य रोजगार मेळावा” घेण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












