न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वयक ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढविण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.
त्यानुसार महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रार वजा सूचना मांडल्या. यात
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे २१, ११, ३, ३, १२, ७, ११ आणि ११ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
या सभेकरिता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या जनसंवाद सभेस क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.
जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पथारीवाल्यांना पर्यायी जागा
उपलब्ध करून द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, रस्त्यांवरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, शहर परिसरात वेळोवेळी किटकनाशक फवारणी करण्यात यावी, अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध व निष्कासनाची कारवाई करावी अशा सूचनावजा तक्रारींचा समावेश आहे.












