- अनधिकृत झोपडपट्ट्या उठविण्याची उद्योजकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरामधील एमआयडीसीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणांचा २००२ नंतर सर्वेच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. २००२ मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार एमआयडीसीच्या सुमारे १५० एकर जागेवर १६ झोपडपट्ट्यांसह अनेकांनी अतिक्रमण केले. आहे. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे उद्योगांना विस्तार करण्यासाठी नवीन जागा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २००२ साली शहरातील झोपडपट्ट्यांचा सर्वे केला. त्यात एमआयडीसीच्या जागेवर एकूण किती झोपड्या आहेत. झोपडपट्ट्यांचे क्षेत्रफळ, झोपड्यांची संख्या, लोकसंख्या, आरक्षणाची माहिती व शेरा आदींची नोंद ठेवण्यात आली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेनुसार शहरात एकूण १६ झोपडपट्ट्याचे एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या पैकी ५ अघोषित तर १२ घोषित झोपडपट्ट्यांचा समावेश आहे.
एमआयडीसीची पिंपरी व भोसरी परिसरात एकूण ११०० हेक्टर जागा आहे. झोपडपट्ट्याचे अतिक्रमण झाल्यामुळे सुमारे १५० एकर जागा अंतर्गत आली आहे. झोपडपट्ट्यां अतिक्रमण झाल्यामुळे उद्योगांना आता त्यांची हक्काची जागा मिळेनासी झाली आहे. सध्या एमआयडीसीकडे जागाच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागतो. कंपनीचा विस्तार करता येत नाही. त्यासाठी परवानगी काढताना उद्योजकांच्या नाकी नऊ येत आहे. शासनाच्या वतीने एसआरए योजना राबविण्यात येणार आहे. मात्र ज्या ठिकाणी मोठी झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी सर्व झोपडपट्ट्यांचे पुनवर्सन करावे, अशी मागणी उद्योजक करत आहेत. त्यामुळे जागा शिल्लक राहून त्याचा उद्योगांना वापर करता येईल.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध कारणांसाठी एमआयडीसीकडून मोकळे भूखंड देण्यात आलेले आहेत. मात्र ज्या कारणांसाठी हे भूखंड दिले आहेत, त्याचा उद्देश पूर्ण होताना दिसत नसल्याच्या तक्रारी उद्योजक करत आहेत. अशा भूखंडावर अनधिकृतपणे अतिक्रमणे करून गैरवापर केला जात आहे. त्यामुळे ही भूखंड पुन्हा ताब्यात घेऊन त्याचे प्लॉट करून उद्योजकांना ताब्यात देण्याची मागणी उद्योजक करत आहेत.












