न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- नेहरुनगर येथील नियोजित इमारतीत पिंपरीतील मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ५ न्यायदंडाधिकारी यांची न्यायालये सुरू केली जाणार आहेत. येत्या ५ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते या नवीन न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. नारायण रसाळ, महिला सचिव अॅड. प्रमिला गाडे यांनी दिली.
नेहरुनगर येथे सुरुवातीला ५ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांची न्यायालये स्थलांतर होतील. त्याशिवाय आणखी नवीन सहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालये मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे, मोरवाडी येथील जुन्या इमारतीत सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच मोटर वाहन न्यायालय सुरू व्हावे, यासाठी असोसिएशकडून पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, मोशी येथील न्यायसंकुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत नेहरुनगर येथील इमारतीत न्यायालयांचे कामकाज चालणार आहे. मोशीतील न्यायसंकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही न्यायालये तेथे स्थलांतर होतील.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या हिंजवडी, वाकड, रावेत आणि दिघी पोलिस ठाण्यांचे न्यायालयीन कामकाज बाहेरच्या न्यायालयातून चालत आहे. हिंजवडी आणि वाकड पोलिस ठाण्याचे न्यायालयीन कामकाज शिवाजीनगर न्यायालयातून, रावेत पोलिस ठाण्याचे वडगाव मावळ न्यायालयातून तर, दिघी पोलिस ठाण्याचे खडकी न्यायालयातून कामकाज चालते. या चारही पोलिस ठाण्यांचे न्यायालयीन कामकाज आता नेहरुनगर येथील नियोजित न्यायालयातून चालणार आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकील यांचा वेळ व पैसा वाचणार आहे.












