न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापुर्वी शहरातील सर्व नाल्यांची शंभर टक्के साफसफाई करा अशी मागणी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की पिंपरी चिंचवड शहरात १३५ छोटे आणि ५७ मोठे नाले आहेत. त्या नाल्यांची स्वच्छता दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी करण्यात येते. मात्र, पावसाळा तोंडावर येवूनही अद्याप ४५ टक्के नाल्यांची साफसफाई झालेली आहे. शहरातील अनेक नैसर्गिक नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण होऊन नालेच गायब केले आहेत. तर काही ठिकाणी नाल्यात राडारोडा, कचरा, रसायनमिश्रित औद्योगिक सांडपाणी, मैला शुद्धीकरणाचे पाणी सोडून नाले मोठ्या प्रमाणात प्रदूषित केले जात आहेत. नाल्यातील हे प्रदूषित पाणी जाऊन पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांना मिळत आहे. त्यामुळे या नद्याही प्रदूषित होऊन त्यांची गटारे झाली आहेत.
नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन ठिकठिकाणी रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्यातील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. काही भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती होत आहे. नाल्यांजवळ असलेल्या जलवाहिन्यांमध्ये नाल्यातील सांडपाणी मिसळते. त्यामुळे जलवाहिनीतून दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणीपुरवठा देखील होत आहे.
दरम्यान, शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई पुर्ण झालेली नाही. ठिकठिकाणी नैसर्गिक नाले, शहरातील नाले अद्याप अस्वच्छ राहिलेले आहेत. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापुर्वी नाल्यांची शंभर टक्के साफसफाई करण्यात यावी. नाल्यांतील अतिक्रमणावर कारवाई करावी, राडारोडा, झाडेझुडपे काढण्यात यावीत. नाल्यांत कचरा टाकणा-यावर कडक कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
















