- महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार कोणाकडे मांडायची?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये २२३७ महिला कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी विशाखा समिती स्थापन केली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून या समितीवर अध्यक्षच नाही. त्यामुळे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना तक्रार कोणाकडे मांडायची, हा प्रश्न पडला आहे.
महापालिकेमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे तसेच त्यांना कोणी त्रास दिल्यास तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध विभागांतील महिला सदस्य म्हणून असतात तर ‘अ’ वर्ग महिला अधिकारी अध्यक्ष असतात. या समितीकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेत समितीच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांना न्याय दिला जातो. या समितीवर सहआयुक्त आशादेवी दुरगुडे अध्यक्ष म्हणून होत्या. मात्र, त्या सेवानिवृत्त झाल्याने दोन महिन्यांपासून या समितीवर अध्यक्ष नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार कुठे करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दरम्यान महिला अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने या समितीवर अध्यक्ष नाही. विशाखा समितीवर अध्यक्ष नेमण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. तो महापालिका आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी ठेवला आहे. त्यावर स्वाक्षरी झाल्यास तत्काळ अध्यक्षांची नेमणूक करण्य येईल, अशी माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपयुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
















