न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील खासगी आणि मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास वितरण केले जात आहेत. १५ जूनपासून पीएमपीच्या सर्व आगारांमध्ये आणि पास केंद्रावर अर्ज उपलब्ध करून दिले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीकडून विविध योजनांद्वारे विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास वितरित केले जात आहेत. महापालिकेच्या शाळेतील ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील खासगी शाळेतील ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीच्या दरात बस पास दिले जात आहेत.
खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाच्या आगारामध्ये अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांच्या प्रवासाच्या अंतरानुसार एकूण पासच्या रकमेच्या २५ टक्के रकमेनुसार चलन तयार करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत चलन भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि चलन जोडावे लागेल.
पास केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पीएमपीएमएलकडून एकत्रित पास देण्याची सुविधा दिली आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांकरिता संबंधित शाळेच्या प्रतिनिधीमार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकरिता एकत्रित अर्ज घेऊन जाऊ शकतात. तसेच सर्व अर्ज भरून एकत्रितरीत्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शाळांना एकत्रित पास दिले जाणार आहेत. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाच्या आगारामध्ये अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांच्या प्रवासाच्या अंतरानुसार एकूण पासच्या रकमेच्या २५ टक्के रकमेनुसार चलन तयार करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत चलन भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि चलन जोडावे लागेल.












