न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. हत्येनंतर फरार झालेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली. यात त्यांनी राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचं कारणही सांगितलं. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल गुरुवारी (२२ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
अंकित गोयल म्हणाले, “आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला. दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपीला राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं. दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.”
“दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर होतं. त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती. दोघांचं प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल,” असंही अधीक्षक गोयल यांनी नमूद केलं.