- आरटीओ कार्यालयाकडून शाळांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी असणाऱ्या वाहनांची तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. वाहन योग्यतेबाबत तपासणी करून प्रमाणपत्र त्वरीत घेण्याबाबत आरटीओ कार्यालयाकडून सूचना दिल्या आहेत. अन्यथा संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील शाळा सुरू झाल्या असून खासगी शाळांच्या बसेसही रस्त्यावर धावू लागल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे. अनेक शाळा वाहन तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होऊन दुर्घटना झाल्यानंतर अनेकांचे डोळे उघडत आहेत. त्यापूर्वीच काळजी घेण्याचे आवाहन आरटीओ करतात. शहरातील शाळांनी वाहन तपासणी न केल्याचे निदर्शनास येताच आरटीओकडून आवाहन केले जात आहे.
स्कूल बस चालक व मालकांनी तातडीने वाहन योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. बस चालकांनी मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वेळ घ्यावी. तेथे शुल्क भरावे. तसेच वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आणि नवीन परवाना घ्यावा असे आवाहन आरटीओने केले आहे.