न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२३) :- मावळातील कुंडमळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. कॉलेजचा तास बुडवून सात ते आठ तरुण कुंडमळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तिथे, पाण्याचा अंदाज न आल्याने अशोक गुलाब चव्हाण (वय १८) आणि अंकित वर्मा (वय १७) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
या तरुणांना स्थानिक गावकऱ्यांनी कुंडमळ्यात न जाण्याचा सल्ला दिला होता. पण तरुणांनी ऐकलं नाही आणि ते कुंडमळ्यात पोहण्यासाठी उतरले. पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अशोक चव्हाण आणि अंकित वर्मा हे त्यांच्या इतर पाच ते सहा मित्रांसह चिखली येथील कॉलेज बंद करून कुंडमाळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, कुंडमळ्यात पोहण्याचा आनंद घेण्याअगोदर स्थानिक नागरिकांनी तसेच कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी तरुणांना कुंडमळ्यात जाण्यास मज्जाव केला होता. पाणी खोल आहे. पाण्यात उतरू नका, असे सांगितलं होतं. सात ते आठ मुलं पाण्यात उतरले. अशोक आणि अंकित यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. एकाचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा मिळाला तर दुसऱ्याचा मृतदेह शनिवारी सकाळी मिळाला आहे. पोलिसांनी याबाबत मृत तरुणांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.












