न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- यंदाही दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जाईल. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्यातील नागरिकांना ही गोड बातमी दिली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार असून यामध्ये दोन नवीन जिन्नसांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
आंनदाचा शिधा या संचात १ किलो साखर, १ लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चासदेखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.















