न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नाम निर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून ३ ऑक्टोबर २०२३ रोजी केली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील मुदत सकाळी ११ ते दुपारी ३ ऐवजी आता सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान ५ नोव्हेंबर रोजी होईल.











