न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- राज्य सरकारच्या उद्योग सहसंचालनालयाअंतर्गत सामान्य नागरिकांनाही उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ मिळावा, या हेतूने चिंचवड येथील ऑटोक्लस्ट येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) च्या विशेष कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवड कार्यालय प्रकल्प अधिकारी मिलिंद लोंढे यांनी दिली.
या कार्यालयामार्फत नागरिकांना उद्योजकता विकासाकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. उद्योजकता परिचय कार्यक्रमामार्फत नवउद्योजकांना उद्योग व्यवसायामध्ये असणाऱ्या विविध संधी, आवश्यक विविध नोंदण्या व परवाने, शासकीय कर्ज योजना व अनुदान याबाबत माहिती देऊन त्यांच्या मध्ये स्वयंप्रेरणा निर्माण या उद्योजकीय मानसिकता सबळ होण्यास मदत व्हावी, याकरीता पुढील काळात कार्यक्रमांचेदेखील नियोजन संस्था करणार आहे.
उद्योग विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अनुदानावर आधारित शासकीय कर्ज योजनांचा लाभ घेणेकरिता आवश्यक व बंधनकारक असणारा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे करिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही शासनाची एकमेव अधिकृत संस्था आहे. राज्याच्या औद्योगिक क्रांतीमध्ये व परिणामी आर्थिक विकासामध्ये पिंपरी चिंचवडचे फार मोठे योगदान आहे. या शहरातील नागरिकांनी या विशेष कार्यालयाशी संपर्क साधून, स्वयंरोजगाराबाबत मोफत उद्योजकीय प्रशिक्षण प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














