न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- अलीकडच्या काळात अनेक विमा कंपन्या मोफत आरोग्य तपासणीचे आमिष दाखवून ग्राहकांकडून पॉलिसी उतरवून घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे डॉटरांची वाढती कन्सल्टिंग फिस. महागडया फीसमुळे नागरिक नियमित तपासणी करत नाहीत. अशा स्थितीत मोफत आरोग्य तपासणी करणारी पॉलिसी नागरिकांना चांगली वाटते. मात्र विमातज्ज्ञांच्या मते मोफत तपासणीच्या नावाखाली पॉलिसी काढण्याची बाब खर्चिक ठरू शकते.
आरोग्य विमा ही आजच्या काळाची गरज आहे. विम्याच्या रकमेवर आरोग्य सेवा मिळत असते. यामुळे प्राप्तीकरातही लाभ मिळत असल्याने बहुतांश नोकरदार वर्ग हेल्थ इन्शुरन्स उतरवण्याबाबत आग्रही असतात. आजकाल आरोग्य विमा देणार्य अनेक कंपन्या ग्राहकांना ऑफर देतात. यात मोफत आरोग्य तपासणीचा समावेश केलेला असतो. मात्र, या तपासणीचे स्वरूप पाहून आरोग्य विमा घेण्याचा विचार करावा.
साधारणपणे मोफत आरोग्य तपासणीचा लाभ हा पॉलिसी घेतल्यानंतर ठराविक काळानंतर मिळतो. बहुतांश कंपन्या पॉलिसी घेतल्यानंतर तीन ते चार वर्षांनंतर मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देते. त्याचवेळी काही कंपन्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याबरोबरच तपासणीची सुविधा देतात. याप्रमाणे पॉलिसीचा हप्ता देखील अधिक असतो. अनेकदा तर जेवढ्या किमतीची मोफत तपासणी असते, ती कुटुंबासाठी पुरेशी ठरत नाही.
विमा कंपन्या मोफत आरोग्य तपासणीसाठी खूपच कमी पैसा उपलब्ध करून देतात. जर तीन लाखांची फॅमिली फ्लोटर हेल्थ पॉलिसी असेल तर कंपनी केवळ ८०० रुपये उपलब्ध करून देते. त्याचवेळी मोफत तपासणीसाठी दिला जाणारा पैसा हा विम्याच्या हप्त्यावर किंवा विमा रकमेवर अवलंबून असतो. जर भविष्यात नो क्लेम बोनसमुळे विम्याची किंमत वाढत असली तरी त्या प्रमाणात तपासणी फीसची रक्कम वाढत नाही.
काही कंपन्या दोन वर्षांत एकदा रक्कम उपलब्ध करुन देते. तज्ज्ञांच्या मते, पॉलिसीकडून मिळणारी ही सुविधा चांगली असली तरी त्या आधारावर पॉलिसी खरेदी करणे नुकसानकारक ठरू शकते. पॉलिसी घेताना पॉलिसीत कोणकोणत्या आजाराचा समावेश होत नाही, दाव्याची प्रक्रिया, वेटिंग पिरियड, रुग्णालयाचे जाळे, दाखल झाल्यानंतर मिळणारे कवच, नूतनीकरण या आधारावर पॉलिसीची पडताळणी करणे गरजेचे आहे.
अनेक विमा कंपन्या हेल्थ पॉलिसी घेण्यापूर्वी आरोग्य तपासणीची मागणी करतात. त्यामागे काही तर्क लावले जातात. विमाधारकाला अगोदरपासून काही आजार आहेत का याचे आकलन केले जाते. अशा स्थितीत पॉलिसी काढताना माहिती दिली नाही तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. जर आपणही आरोग्य विमा उतरवण्याचा विचार करत असाल तर आरोग्य तपासणी स्वत:च करावी आणि त्याची नोंद करत राहवी.