न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- औद्योगिक क्षेत्रातील गुंडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आणि नगरसेवक केशव घोळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, तळवडे, चाकण, चिखली, कुदळवाडी परिसरातील लघु उद्योजकांना, छोटे मोठ्या कारखानदारांना दररोज काही गुंड धमकावत आहेत. त्यांच्याकडे स्क्रॅप, माथाडी, लेबर सप्लायर्सच्या नावाखाली राजरोसपणे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. तसेच कारखाना चालवण्यास मज्जाव करीत आहेत. हप्त्याची मागणी करुन, उद्योजकांना त्रास दिला जात आहे.
त्या गुंडाच्या गैरवर्तणुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक उद्योजकांनी बँकामधून कर्ज काढून, उद्योगधंदे सुरु केलेले आहेत. कर्जाचे हप्ते फेडणे त्यांना खुपच कठीण होत आहे. ते उद्योग चालवण्यासाठी खुप परिश्रम घेत आहेत. मात्र, संबंधित गुंड मोठ्या गाड्यामधून ८ ते १० गुंडाना घेवून कंपनीमध्ये येतात. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत, पैसे वसुलीचे काम करीत आहेत.
जे उद्योजक पैसे देत नाहीत त्यांना कंपनी बंद करण्यास सांगत आहेत, अशा गुंडांना तातडीने जेरबंद करून, त्यांचा बंदोबस्त करावा, संबंधितावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केशव घोळवे यांनी या पत्रात केली आहे











