- पीसीयुमध्ये दीक्षारंभ सोहळ्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- विद्यार्थ्यांनी शिस्त, सचोटी आत्मसात केली पाहिजे. हाच यशाचा भक्कम पाया आहे. ध्येयाचा दृढनिश्चय आणि लवचिकतेने पाठपुरावा केला पाहिजे असे मार्गदर्शन कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते, वडगाव मावळ येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुसरा दीक्षारंभ’ सोहळा बुधवारी (२१ ऑगस्ट) आयोजित केला होता.
यावेळी ऍस्ट्रो एमएनसीचे संस्थापक आणि कॅपजेमिनीचे माजी संचालक मिलिंद चितांबर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. आर. जी. बिरादार आदी उपस्थित होते. भारतातील विविध राज्यांसह आफ्रिका, युएई आणि नेपाळ या देशातील विद्यार्थ्यांनी पीसीयु मध्ये प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
फुलारी यांनी महाविद्यालये आणि वसतिगृहांमधील रॅगिंगच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत अशा घटनांना कठोरपणे प्रतिबंध करण्यासाठी समवयस्कांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तसेच समाईक गट तयार करण्याचे आवाहन फुलारी यांनी केले.
अभियांत्रिकीच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात नाविन्य आणि अनुकूलतेला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासली पाहिजे. कौशल्य विकासावर भर देऊन ज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मिलिंद चितांबर यांनी सांगितले.
सर्वांगीण शिक्षणाचे महत्त्व आणि भविष्य घडवण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी सक्रिय शिकण्यासाठी आणि समाजासाठी सकारात्मक योगदान दिले पाहिजे असे डॉ. विद्यासागर पंडित म्हणाले.
शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा साध्य करण्यासाठी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला आहे. शैक्षणिक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीसीयु मध्ये अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याचा विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात निश्चितच फायदा होईल असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी पीसीयुमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुदीप थेपडे यांनी केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.