न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२५) :- पिंपळे निलख येथून वाहत असलेल्या मुळा नदी प्रवाहात मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला आहे. अनेक कंपन्यांचे दूषित पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. तसेच अनेक ठिकाणाहून सांडपाणी नदीमध्ये सोडलं जात. या केमिकलमुळे, सांडपाण्यामुळे नदीवर फेस निर्माण होतो. तसेच अनेक जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो.
नदी सुधार प्रकल्प या गोंडस नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना नक्की नदी सुधार होतोय का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला दिसतो. तसेच नदी सुधार प्रकल्पामुळे नक्की नदीला कोणता फायदा होणार आहे आणि कोणत्या प्रकारचा होणार आहे? याचे समाधानकारक उत्तर प्रशासन देऊ शकले नाही.
दरम्यान आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढा; नाहीतर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावे लागेल, असा त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.















