न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- निगडीकडून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या तीन लॉटरी सेंटरवर छापा मारुन पोलिसांनी ४ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये २० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. निगडी पोलिसांनी मंगळवारी (दि. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई केली.
महालक्षमी लॉटरी सेंटरचा विजय शंकर रोमन (वय ४८), लोखंडे लॉटरी सेंटरचा मुन्ना उर्फ विजयकुमार महादेव शर्मा (वय ३५) आणि योगेश्वर लॉटरी सेंटरचा शरद सुभाषचंद्र केसरवानी (वय ३२) यांच्यासह २० जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तीनही ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती.
या कारवाईत रोख ५५ हजार ३० रुपये, १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी, १ लाख ३ हजार रुपयांचे १३ मोबाईल संच व जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.