न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- निवृत्तिवेतनासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधा देण्यात आली आहे, त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांना दिलासा मिळाला आहे. ईपीएफओ निवृत्तिवेतनधारक दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पीएफ कार्यालयाला भेट देतात व त्यांचे जीवन प्रमाणपत्र पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी सादर करतात.
कोविड – १९ साथीच्या सद्यःस्थितीत पेन्शनधारकांनी सुरक्षित राहावे, म्हणूनच ईपीएफओने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी बँका, कॉमन सर्व्हिस सेंटरसह (सीएससी) पोस्ट ऑफिस यांच्याशी सक्रिय भागीदारी केली आह. ईपीएफओने या एजन्सींना जीवन प्रमाणपत्र घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ईपीएस निवृत्तिवेतनधारकांनी जवळच्या बँक, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सामान्य सेवा केंद्रावर आधार आधारित बायोमेट्रिक डिजिटल लाइफ सर्टिफिकेट किंवा जीवन ( डीएलसी ) प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती केली आहे.
निवृत्तिवेतनधारकांना त्यासाठी फक्त त्यांचा मोबाईल, बैंक पासबुक, पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. निवृत्तिवेतनधारक पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून घरून जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन जमा करू शकतात. पोस्ट ऑफिसदद्वारे त्यासाठी फी आकारली जाईल. ईपीएफओच्या नवीन दिशानिर्देशानुसार जीवन प्रमाणपत्र सादर तारखेपासून एक वर्षासाठी वैध राहील.
उदाहरणार्थ डिसेंबर २०१९ मध्ये सादर केलेले डिजिटल जीवन प्रमाणपत्र वर्षासाठी म्हणजेच डिसेंबर २०२० पर्यंतच्या मासिक पेन्शनसाठी वैध असेल. म्हणजेच ज्या महिन्यात प्रमाणपत्र सादर केले असेल, ते पुढच्या वर्षी त्या महिन्यापर्यंत वैध राहील. पेशनधारकांनी उमंग अॅपचा उपयोग करून त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन आकुर्डी कार्यालय यांनी केले आहे.