- ग्राहकहितासाठी बांधकाम व्यसायिकांनी १ टक्के मुद्रांक शुल्क भरावा..
- क्रेडाई बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेकडून आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२१) :- राज्य सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर २०२० दरम्यान मुद्रांक शुल्कावर दिलेल्या सवलतीला घर खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कालावधीत मुद्रांक शुल्क हे ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणण्यात आले होते. जानेवारी ते मार्च २०२१ या काळात मुद्रांक शुल्क हे ३ % इतके असणार आहे. मात्र, ग्राहकहिताचा विचार करता स्वत: बांधकाम व्यसायिकांनी यापैकी १ % टक्के शुल्क भरावे, जेणेकरून मार्च अखेरपर्यंत ग्राहकांसाठी मुद्रांक शुल्क हे २ % इतकेच राहील, असे आवाहन क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेने केले आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चेट म्हणाले की, १ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात मिळालेल्या सवलतीनंतर घर खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह वाढला असून, मुद्रांक शुल्क विभागात दस्त नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ही परिस्थिती कायम राहावी, या दृष्टीने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने ही सवलत जून २०२१ पर्यंत कायम करावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली होती.
बांधकाम क्षेत्राशी इतर किमान ३०० व्यवसाय जोडलेले असून या निर्णयाचा फायदा ग्राहकांसोबतच या सर्वांनादेखील होईल, असा आमचा यामागील विचार होता. मात्र, सरकारने अद्यापि ही विनंती मान्य केलेली नाही. त्यामुळे केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार करीत पुढील काही दिवस बांधकाम विकसकांनी हे १ टक्के मुद्रांक शुल्क स्वतः भरावे व ग्राहकांना मागील प्रमाणे २ % इतकेच मुद्रांक शुल्क कायम ठेवण्यात मदत करावी, असे आवाहन आम्ही करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.