- येत्या शनिवारपासून शहरात कोरोना लसीकरण मोहीम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेस शासनाकडून कोरोना लसीचे १५ हजार डोस मंगळवारी (दि. १२) रात्री अडीचला प्राप्त झाले. प्राप्त झालेली लस महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आली आहे.
तेथून शहरातील विविध १६ केंद्रात त्यांचा शनिवार (दि. १६) पासून पुरवठा केला जाणार आहे. कोरोना लसीकरण मोहीम शहरात शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. ती लस आरोग्य सेवा देणाऱ्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्याने देण्यात येणार आहे. पालिकेकडे आजपर्यंत एकूण १७ हजार ७९२ जणांनी नोंदणी केली आहे.
लसीकरण पालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, पिंपरी कॅम्पातील जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व चिंचवडच्या ईएसआयएस रुग्णालय येथे केले जाणार आहे. त्यानंतर खासगी रुग्णालयांत लसीकरण केले जाणार आहे.














