- तब्बल १२ लाख ६५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- सोनसाखळी चोरी करणारे आरोपी हे देहू फाट्याकडून मोशीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डुडुळगाव येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. वाकड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना ५ फेब्रुवारी रोजी अटक केली.
आरोपींनी त्यांचा साथीदार आरोपी मोहसीन लालू जाफरी (रा. रायसेन, मध्यप्रदेश) याच्यासोबत सोनसाखळी चोरी केल्या. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील ११ लाख रुपये किंमतीचे २२० ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच एक लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, असा एकूण १२ लाख ६५ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्यामध्ये वाकड, सांगवी, देहूरोड या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी तीन गुन्हे, चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, एमआयडीसी भोसरी, दिघी, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच गंगाखेड (परभणी) या पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक, असे सोनसाखळी चोरीचे गुन्हे, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी एक गुन्हा व वाहन चोरीचे दोन गुन्हे, असे एकूण १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे दरोडा व जबरी चोरीचे २२ गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी याच्याविरोधात पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे जबरी चोरी व वाहन चोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. सफिर फिरोज खान (वय ३५, रा. लोणावळा), मोहम्मद उर्फ डॉन शहाबुद्दीन इराणी (वय २५, रा. शिवाजी नगर, पुणे), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.