- राम-लक्ष्मण जोडीकडून भल्या-भल्यांच्या अंदाजाला छेद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भोसरीचे नगरसेवक नितीन लांडगे यांचे नाव भाजपकडून निश्चित झाले असून, त्यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, नगरसेवक विलास मडीगेरी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी तर्फे प्रवीण भालेकर यांचा अर्ज दाखल!
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवक प्रवीण भालेकर यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी सभापती पदासाठीचा अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक राजू बनसोडे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, पक्षनेते संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.
पक्षीय बलानुसार सत्ताधारी भाजपचाच स्थायी सभापती होणार ही काळ्या दगडावरची रेख असली तरी, राष्ट्रवादीने परंपरेनुसार निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा चंगच बांधला आहे. येत्या ५ मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत.