- पालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अधिकारी बैठकीसाठी व इतर कामांसाठी परस्पर लोकप्रतिनिधींच्या घरी किंवा जनसंपर्क कार्यालयात जातात. महापालिकेच्या कामांसंदर्भात तेथे चर्चा केली जाते.
नुकतीच चिंचवड विधानसभा आमदारांच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक झाली. ही पद्धत अयोग्य असून, असे प्रकार या पुढे घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी (दि.१) दिला आहे.
शहरातील विविध लोकप्रतिनिधी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या घरी व जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेतात. तेथे त्यांना अरेरावी केली जाते. तसेच, शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्या संदर्भात महापालिका अधिकारी, संघटना आणि कर्मचारी महासंघाने आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परवानगी न घेता परस्पर खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घरी किंवा जनसंपर्क कार्यालयात न जाण्याचा आदेश काढला होता. मात्र, त्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अनेक अधिकारी व कर्मचारी परस्पर लोकप्रतिनिर्धीच्या घरी व जनसंपर्क कार्यालयात वारंवार जात असतात, यापुढे अधिकारी बेजाबदारपणे वागल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.