- अडथळ्याविना बीज महोत्सव उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२२) :- संत तुकाराम महाराजांच्या ३७४ वा बीज सोहळ्यासाठी देहूत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या घेऊन देहूत दाखल झाल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांचा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरात देहूरोड येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली सण, उत्सव साधेपणाने साजरे केले जात होते. गर्दी टाळून कार्यक्रमांना भाविकांनी हजेरी लावली. आज देहूनगरीत असंख्य भाविक आणि वारकरी दाखल झाल्याचे दिसून आले. शनिवारपासूनच मुख्य देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. इंद्रायणी नदीला पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठलरुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले.
बीज सोहळ्यासाठी पंढरपूर, आळंदी या भागातून आलेल्या प्रसाद विक्रेत्यांनी ठिकठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली होती. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य सोहळा वैकुंठस्थान मंदिरात संपन्न झाला. त्यानंतर वारकऱ्यांची परतीच्या मार्गाकडे जाताना लगबग दिसून आली.