न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२२) :- तरुण दारूच्या नशेत थेट उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढला. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ तो टॉवरच्या टोकावर बसून होता. सुदैवाने त्याला विजेचा शॉक बसला नाही. दरम्यान रविवारी (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास संबंधित इसमाला विद्युत वाहिनीच्या टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्याचे मनपरिवर्तन करताना पोलिस, वीज वितरण कंपनी व स्थानिकांच्या नाकीनऊ आले होते.
किशोर दगडोबा पैठणे (वय ३० वर्षे सध्या रा. वाघोली पुणे, मूळ रा. मेळा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा) हा दारूच्या नशेत शनिवारी (दि.१९) रात्री केळगाव हद्दीतील उच्च दाब विद्युत वाहिनी टॉवरच्या टोकावर चढून बसला. स्थानिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरूणाला टॉवरवरून खाली उतरविण्याची विनंती केली. मात्र तो काही केल्या खाली येईना.
त्यानंतर पोलिसांनी विद्युत वीज महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले. सलग चार – पाच तास त्याला खाली उतरविण्यासाठी अथक प्रयत्न करूनही तो काही येईना. अक्षरशः त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्र जागून काढली. आळंदी पोलिसांनी दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याची आई लता दगडोबा पैठने यांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले.