न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वात बुधवारी (१६ एप्रिल) ‘संविधान शिल्पकार’ या महानाटकाचे सादरीकरण होणार आहे.
नागपूर येथील ‘द बोधिसत्व फाऊंडेशन’ संस्था प्रस्तुत हे महानाटक पिंपरी येथील एच.ए.मैदान येथे सायंकाळी पाच वाजता सुरू होईल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महानाटकाला उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
‘संविधान शिल्पकार’ या महानाटकात १५० पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असणार आहे. या महानाटकात युगनायक फेम सुप्रसिद्ध अभिनेते अथर्व कर्वे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करत असून माता रमाई यांच्या भूमिकेत विविध पारितोषिक प्राप्त नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने असणार आहेत. अनेक सिने आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचा सहभाग असणाऱ्या या महानाटकाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
‘संविधान शिल्पकार’ महानाटकाला सुरुवात होण्यापूर्वी एच.ए.मैदानावर लाईव्ह ऑर्केस्ट्रा, गीत आणि नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी रॅपर विपीन ताथड यांचे ढोल-ताशा पथक हे रॅप सादर करणार आहेत. नागरिकांना ढोल-ताशाच्या निनादातील हा अनोखा रॅप पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.