- अभिषेक बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाचा स्वीकारला कारभार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अभिषेक बारणे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. महापालिका भवनातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात हा पदभार स्वीकारण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, अशा परिस्थितीत स्थायी समितीची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासावर प्रतिक्रिया देताना अभिषेक बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे देशातील एक प्रगत शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर माझा भर राहील. प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर स्थायी समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घेतले जातील. सामान्य नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा हा शहराच्या हितासाठी आणि दर्जेदार कामांसाठीच खर्च होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घेतली जाईल.
आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागांतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून अभिषेक बारणे यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य असेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात शहरातील सुरु असलेले आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.












