- पोलीस आणि न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. 25 जुन 2025) :- जुन्या वादातून तरुणावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अवघ्या एका दिवसात न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.
तरुणाचे दोन्ही हातांचे पंजे तुटूनही न्यायालयाने हा निर्णय दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी बुधवारी (दि. २५) यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिस आयुक्त कार्यालयासमोर गर्दी करून निषेध नोंदवला आहे.
राहुल प्रल्हाद कनघरे (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी राहुलच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी रोहन सोपान निमज (वय २०), शुभम पवार (वय २०) आणि प्रशांत उर्फ बापू सकट (वय २२) या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राहुल आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाला होता. याचा राग मनात ठेवून तिघांनी संगनमताने राहुलवर कोयत्याने हल्ला केला. आरोपींनी “आम्ही इथले भाई आहोत,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली होती.
मात्र, इतक्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामिनावर मुक्त करण्यात आल्यामुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. त्यांनी सकाळी आयुक्त कार्यालय आणि वाकड पोलिस ठाण्याबाहेर गर्दी करत निषेध नोंदवला. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाद अर्ज (अपील प्रक्रिया) सुरू केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी जखमीच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “गुन्हा गंभीर असून यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. कायदेशीर पातळीवर आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.