- दोघांच्या एकत्रित आत्महत्येचं कारण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जुन्नर (दि. 25 जुन 2025) :- घरातून बेपत्ता असलेल्या रामचंद्र पारधी (वय ४०) व एका १७ वर्षाच्या तरुणीनं दुर्गवाडी (ता. जुन्नर) येथील कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. दोघांच्या एकत्रित आत्महत्येचं कारण तपासाअंती स्पष्ट होईल, असं पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितलं.
दुर्गवाडीचे पोलिस पाटील दीपक पारधी यांनी ह्या घटनेची फिर्याद दिली आहे. यात कोकणकड्याजवळ उभी असलेली कार व तेथून जवळच महिला व पुरुषाची चप्पल जोड दिसून आल्याने कड्याच्या खाली पाहिले असता, त्यांना मृतदेह दिसून आला असल्याचे नमूद केले आहे.
याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी रविवारी (ता. २२) शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दाट धुके आणि पाऊस तसेच अंधार पडल्याने शोध घेता आला नाही. पोलिसांनी सोमवारी (ता. २३) मृतदेहाचा शोध घेतला, तेव्हा प्रथम तरुणी तर तेथून जवळच रामचंद्राचा मृतदेह मिळून आला.
येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम, पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने कोकणकड्याच्या खोल दरीतून दोघांचे मृतदेह वर काढले. त्यांच्या नातेवाइकांनी ते ओळखले. मृत पारधी यांची कोकणकड्यावर असलेली कार जुन्नर पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे. पोलिस पाटील दीपक पारधी यांच्या फिर्यादीनुसार, जुन्नर पोलिसांनी आकस्मिक मयत म्हणून नोंद केली आहे.
आत्महत्येपूर्वी रामचंद्र व तरुणी यांनी स्वतंत्रपणे लिहून ठेवलेल्या चिठ्ठया पोलिसांना मिळाल्या असून त्यात उल्लेख केलेल्या संबंधित नातेवाइकांकडे चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती आत्महत्येमागील नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे यांनी सांगितले.
मृत तरुणी व रामचंद्र एकमेकांचे नातेवाईक होते. रामचंद्र श्रीगोंदा येथे तलाठी म्हणून कार्यरत होता, तो पत्नीसह अहिल्यानगर येथे राहत होता. त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात केली होती. मृत तरुणी महाविद्यालयात शिकत होती. ती (ता. १४) पासून बेपत्ता असल्याची तक्रार जुन्नर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.










