न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२५) :- तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमता (एआय), ड्रोन सारखे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने महत्त्वाच्या भागीदार संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘भविष्यकालीन तंत्रज्ञानातील कौशल्य संधी – कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान’ या विषयावर निगडी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवाद मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
संस्थेचे सहसंस्थापक व अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी भारतातील भविष्यकालीन कामगार बाजारपेठेचे दृश्य मांडताना सांगितले की, ‘२०२७ पर्यंत भारताला १२.५ लाख कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांची, दरवर्षी १ लाख प्रमाणित ड्रोन ऑपरेटर आणि जवळपास १० लाख सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. ऑटोमेशनमुळे ३० टक्के एंट्री लेव्हल आयटी नोकऱ्यांवर परिणाम होणार असला, तरी एआय आधारित भूमिकांमध्ये १.६ पट वाढ होत आहे. दहावी उत्तीर्ण युवकांसाठी डेटा अॅनोटेशन आणि ड्रोन पायलटिंगसारख्या संधी निर्माण होत असून, पदवीधरांसाठी डेटा अॅनालिस्ट व ड्रोन टेक्निशियनसारखी नवीन पदे खुली होत आहेत.’
‘युवकांच्या संदर्भात उदयोन्मुख नोकरी संधी व आवश्यक कौशल्ये’ या विषयावर देखील परिसंवाद चर्चा झाली. मानस अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थापक अनुप तांबे, डॉ.डी.वाय.पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डॉ.विशाल वडजकर, फ्लायजेन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य वधोकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे बिझनेस ऑपरेशन्स विभागाचे संचालक राजेश खन्ना यांनी या परिसंवाद सहभाग घेतला.












