- नियमभंगाची गंभीर प्रकरणे उघडकीस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन वेगवेगळ्या कर्मचाऱ्यां विरोधात शिस्तभंगाच्या कारवाया करण्यात आल्या असून, आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही कारवाई नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर आधारित आहे.
पहिल्या प्रकरणात, स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनील ज्ञानदेव दांगडे यांना तीन अपत्ये असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम २००५ अन्वये २८ मार्च २००६ नंतर तीन अपत्ये असल्यास शासकीय सेवेतून बडतर्फीची तरतूद आहे. शहर अभियंत्यांकडून खुलासा मागवण्यात आला असता, दांगडे यांनी तिसऱ्या अपत्याच्या जन्माची कबुली दिली. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३(१), शासनाच्या २००५ च्या परिपत्रक आणि महापालिका अधिनियमातील कलम ५६ (१) चे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात कार्यरत सुहास गणपत भगत यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल झाला असून, अटकेनंतरही त्यांनी कामावर नसताना रात्री थम्ब करून गैरप्रकाराने हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. या दिवशी त्यांनी हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी केली नसली, तरी रात्री ८.५५ वा. थम्ब केल्याचे रेकॉर्ड दाखवते. सांगवी पोलिस ठाण्याने गुन्हा नोंदवून महापालिकेस कळवले होते.
या दोन्ही प्रकरणांमुळे महापालिकेच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्तांनी कारवाई करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.










