- अन्यथा उपचार न झाल्यास कोमात जाण्याची शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) :- श्वान किंवा मांजर चावल्यास किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास तात्काळ औषधोपचार घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा रेबीजसारख्या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा उपजिल्हा रुग्णालय, कान्हे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
रेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत उपचार न झाल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. रेबीज विषाणू श्वान, मांजर किंवा इतर संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. चावणे, ओरखड़ा मारणे किंवा उघड्या जखमेला चाटल्यामुळेही विषाणू संक्रमित होतो. मावळ तालुक्यात मागील काही वर्षात रेबीजच्या रुग्णसंख्येत वाढ झाली.
प्राण्याच्या दंशानंतर जखम झालेल्या जागी लाळ असेल तर ती तात्काळ स्वच्छ करणे गरजेचे आहे. पाणी व साबणाने किमान १५ मिनिटे जखम धुणे आवश्यक आहे. त्यानंतर अँटीसेप्टिक औषध लावावे. लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, अस्वस्थता, मेंदू व मज्जासंस्थेवर परिणाम होतात.
पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अशा उपाययोजनांमुळे संसर्ग प्रसार रोखता येतो, असेही वैद्यक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीजविरोधी लसीची उपलब्धता असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. वेळेत लसीकरण केल्यास रेबीजसारख्या आजारावर मात करता येते
– डॉ. बाळासाहेब पाटील, वैद्यकीय अधिकारी…










