- भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस टोकाचा संघर्ष?..
- पक्षश्रेष्ठींच्या छुप्या अजेंड्यामुळे शहरातील महायुतीत तणाव?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तब्बल साडेतीन वर्षांनंतर होत असून, यंदा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे महायुतीतील दोन भागीदार समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका बरखास्त होऊन साडेतीन वर्षे झाली असली, तरी दोन्ही पक्षांनी मैदानात पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे.
भाजपकडून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली १२८ उमेदवारांची यादी तयार असून, चारही आमदार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ३ लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदवले गेले असून, मंडल अध्यक्ष व कार्यकारिणी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत भाजप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कामांचे उद्घाटन, भूमिपूजन होत असून, शहर स्मार्ट केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुन्हा सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी गट-तट एकत्र करून संघटन मजबूत केले आहे. माजी आमदार व नगरसेवक परत आले असून, अजित पवार स्वतः शहरात लक्ष घालून नियोजनबद्ध रणनीती आखत आहेत. महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षांशीही समन्वय ठेवला जात आहे. तसेच, शिवसेनेनेही (एकनाथ शिंदे) एकला चलो रे…चा नारा दिला आहे.
दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचा दावा तर भाजपने कामे पूर्णत्वास नेल्याचा दावा केला आहे. काहीही करा, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपलाच झेंडा फडकला पाहिजे, असे आदेश भाजपा तसेच, राष्ट्रवादीकडून स्थानिक पदाधिका-यांना देण्यात आले आहेत. कामाला लागा जिंकणाऱ्या सक्षम इच्छुकांना उमेदवारी द्या, असे सांगणाऱ्या पक्षश्रेष्ठींकडून अद्याप लढायचे कसे? याबाबत स्थानिक पातळीवरील पदाधिका-यांना कुठलेच संकेत न दिल्याने महायुतीतही ताण निर्माण झाला आहे. एकूणच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमकता आणि भाजपची व्यवस्थात्मक तयारी यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल कुणाच्या पारड्यात झुकतो, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.










