- प्रतिभा कॉलेजमध्ये रोजगार प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात ‘रोजगार प्रशिक्षण व जनजागृती मोहिमे’च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा. यामुळे आत्मविश्वास वाढून कार्यकुशलता विकसित होते. कंपनीतील व्यवहार, तंत्रज्ञान याबद्दल प्रत्यक्ष अनुभव मिळतो.”
यावेळी व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त सहायक आयुक्त अण्णा बोदडे, संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, डिंपल शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वाच्छानी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अण्णा बोदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “स्पर्धेच्या युगात पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षणाचे रूपांतर कौशल्यात करणे आवश्यक आहे. यासाठी इंटर्नशिप म्हणजेच प्रशिक्षण काळ हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.”
या कार्यशाळेत पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी, कार्यकारी व्यवस्थापक, व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. मुलाखतीदरम्यान आत्मविश्वास, योग्य तयारी, सादरीकरण कौशल्य, अर्ज लेखन यासंदर्भात टिप्स देण्यात आल्या.
मान्यवर मार्गदर्शकांमध्ये राजेंद्र कांबळे, महिंद्र पानशे, जितेंद्र सोनार, शंकर साळुंखे, निलेश माटे, अमृता कळंबळेकर, अनुराग तापकीर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उपस्थित तज्ज्ञांना प्रश्न विचारून शंका समाधानाचे लाभ घेतले.
कार्यक्रमाचे स्वागत इंटर्नशिप समितीच्या समन्वयिका प्रा. सुवर्णा गोगटे व प्रा. रसिका पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हर्षिता वाच्छानी तर आभारप्रदर्शन प्रा. दीपाली महाजन यांनी केले.












