- अर्बन स्ट्रीट नावाच्या योजनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात जिकडे तिकडे कृत्रिम वाहतूक कोंडी?..
- शहरी दळणवळण विभागाने साधली अनोखी किमया?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ या बहुचर्चित योजनेविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे. पादचाऱ्यांचे हित जपण्याच्या नावाखाली रस्त्यांची रुंदी कमी करून शहरातील वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होत असल्याची स्पष्ट टीका होत आहे. ही योजना केवळ तत्त्वचिंतनापुरती चांगली असली तरी प्रत्यक्षात ती नागरिकांचे व वाहनचालकांचे जगणे कठीण करतेय, असा आरोप अनेकांनी केला आहे.
अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, हिरवळ आणि विश्रांतीसाठी जागा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या सुविधांचा उपयोग किती नागरिक करत आहेत, याचा कोणताही लेखाजोखा महापालिकेकडे नाही.
सायकल ट्रॅकचा उपयोग कुठे?..
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक तयार केले, पण आजही बहुतांश नागरिक त्याचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे हे ट्रॅक ओस पडतात, तर वाहनचालक त्यावर गाड्या पार्क करतात. यामुळे ना पादचाऱ्यांना जागा उरते ना सायकलस्वारांना.
वाहने पार्किंग आणि ट्रॅफिकची कोंडी – जबाबदार कोण?
अर्बन स्ट्रीटवर वाहनचालकांनी वाहने मध्येच पार्क केल्याने वाहतुकीची कोंडी होते. यावर कोणताही अंकुश ठेवण्यात पालिका अपयशी ठरली आहे. नियोजनाअभावी वाहतुकीचे व्यवस्थापन ढासळत आहे आणि शहरातील नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सेवा रस्ते व महामार्ग अरुंद – उपाय काय?
अर्बन स्ट्रीट प्रकल्पामुळे मुंबई-पुणे महामार्गासह विविध सेवा रस्ते अरुंद झाले आहेत. “जिथे आधीच वाहतूक कोंडी आहे, तिथे रस्ता अजून अरुंद करायचा निर्णय कसा घेतला गेला?” याच्या तुलनेत बीआरटी मार्ग हटवल्यास किमान काही प्रमाणात रस्ता रुंद होऊ शकतो, मात्र त्यावर महापालिका अजूनही निर्णय घेण्यास टाळाटाळ करते आहे.
पादचार्यांना प्राधान्य, पण वाहनचालकांचे काय?
महामार्ग व मुख्य रस्त्यांवर पादचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. अधिकारी सांगतात की, “रस्त्यावर फक्त वाहनचालकांचीच मर्जी चालणार नाही.” पण पादचार्यांसाठी वेगळी व्यवस्था तयार करण्याऐवजी रस्ता अरुंद करून ती व्यवस्था तयार केली जातेय. त्यामुळे पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालक यांच्यात टक्कर होते.
नागरिकांचा रोष वाढतोय…
अनेक स्थानिक आणि व्यापारी याच अर्बन स्ट्रीटमुळे त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी, अर्धवट कामे, चुकीच्या ठिकाणी केलेल्या रचना यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसायही अडचणीत आला आहे.
अर्बन स्ट्रीट डिझाईन ही योजना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महत्त्वाची असली तरी त्याची अंमलबजावणी आणि नियोजनात गंभीर त्रुटी असल्याचा नागरिकांचा ठाम दावा आहे. महापालिकेने याबाबत खुल्या चर्चेच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग घेऊन सुधारित योजना राबवणे गरजेचे आहे.
अर्बन स्ट्रीटमुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यात मदत होईल.
नागरिकांकडून सायकलचा वापर वाढत आहे. नागरिकांनी त्यांची वाहने रस्त्यांवर मध्येच पार्क करू नयेत. खाजगी वाहनांची संख्या कमी करून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अंगिकारावी. रस्त्यावर फक्त वाहनचालकांनीच मर्जी चालवू नये. पादचाऱ्यांच्या सोयींचाही विचार करावा.– मा. बापूसाहेब गायकवाड – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे प्रमुख…












