न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ मे २०१९) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी ११ वाजता जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. यंदा राज्याचा निकाल ८५.८८% टक्के लागला असून तो मागील वर्षापेक्षा २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी माहिती दिली.
बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडली. सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मेच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले, त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.
यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर सर्वात कमी ३२ हजार ३६२ विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.
विभागवार निकाल खालीलप्रमाणे :-
पुणे विभाग : ८७.८८% टक्के
नागपूर विभाग :८२.५१%
औरंगाबाद विभाग : ८७.२९%
मुंबई विभाग : ८३.८५%
कोल्हापूर विभाग : ८७.१२%
अमरावती विभाग : ८७.५५%
नाशिक विभाग :८४.७७%
लातूर विभाग : ८६.०६%
कोकण विभाग : ९३.२३%9
विविध शाखांचा निकाल :-
विज्ञान शाखा निकाल : ९२.६०% टक्के
कला शाखा निकाल : ७६.४५% टक्के
वाणिज्य शाखा निकाल : ८८.२८% टक्के
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : ७८.९३% टक्के


















