न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १८ ऑगस्ट २०२५) – पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या वतीने “श्रावणाचे रंग” हा आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर पार पडला. रविवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात साठ ते ऐंशी वयोगटातील ज्येष्ठ महिलांनी आपल्या कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
लोकगीते, कविता, भारुड, लोकनृत्य, गोंधळ आणि सदाबहार गाण्यांनी वातावरण भारावून गेले. विशेषतः “कानबाई देवीचा महिमा”, “रिमझिम झरती श्रावणधारा” व “सांज ये गोकुळी” या गीतांना प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमाला उन्नती सोशल फाउंडेशनच्या संचालिका डॉ. कुंदाताई भिसे, माजी नगरसेविका निर्मला कुटे आणि वसुंधरा भिसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पद्मा गवळी, करुणा नवले, साधना चौधरी, शैलजा लोकरस यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनी आकर्षक सादरीकरण केले.
प्रास्ताविक शोभा राजगुरे यांनी केले, सूत्रसंचालन शकुंतला शिंदे व निर्मला कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन भामिनी महाले यांनी मानले. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.










