न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुभेदार किरण लोंढे व हवालदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते परेड संचलन होऊन ध्वजास सलामी देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तिमय केले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, अभियंता संदीप चाबुकस्वार (पुणे मनपा), सरपंच फाउंडेशन अध्यक्ष देविदास तांबे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, सामाजिक कार्यकर्ते अरूण तांबे, संकेत कुटे, अमोल घोलप, युवराज प्रगणे, मयूर ओव्हाळ यांच्यासह उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिवंगत विद्याधर लक्ष्मण चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ बक्षिसे वितरित करण्यात आली. शिक्षिका पूजा देवगिरी, अनिता रोडे व सारिका देशमुख यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत देशाबद्दल माहिती दिली. सुभेदार किरण लोंढे यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य, समानता व माणूसपणासाठीचे योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिंपल काळे यांनी संविधान उद्देशिकेच्या वाचनाने केले. सूत्रसंचालन स्वाती वक्टे यांनी तर आभार प्रदर्शन तेजश्री तायडे यांनी केले. शेवटी “वंदे मातरम” गीताने कार्यक्रमाची सांगता झाली व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.










