न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. १५ सप्टेंबर २०२५) :- तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सोमाटणे फाटा–शिरगाव रोडवर वाहतूक पोलिसांवर हल्ला करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
१४ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी प्रशांत महादेव खेडकर (४२, सरकारी नोकरी) तसेच वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ट्राफिक नियोजनाचे काम करत असताना, स्कुटीवरून आलेल्या ओमकार क्षिरसागर (२९, रा. तळेगाव दाभाडे) याने ट्राफिक का काढताय, तुमच्याकडे आदेश आहेत का? असे विचारत वाद घातला. त्याने मोबाईलवर व्हिडिओ काढून तो सीपींना पाठविण्याची धमकी दिली. याचवेळी त्याने पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली.
त्याचा मित्र शुभम गावडे (२९, रा. वराळे) यानेही अरेतुरेची भाषा वापरून पोलिसांना दमदाटी केली. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मपोउपनि गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











