न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. १५ सप्टेंबर २०२५) :- तळेगाव एमआयडीसी परिसरात दोन तरुणांच्या ताब्यातून परवाना नसलेले पिस्तुल सापडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तुल साफ करताना अपघाताने गोळी सुटून एकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शंकर वसंत पाटील (५१), पोलीस हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय कुमार (२८, मुळगाव – बिहार) आणि मंजरिन रजिफ मिया (२४, मुळगाव – बिहार) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या दोघेही मिंढेवाडी (ता. मावळ) येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत.
१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपींकडे सुमारे ३५ हजार रुपयांचे पिस्तुल आढळले. आरोपी विजय कुमार हे पावसामुळे पिस्तुल साफ करत असताना ते लोड झाले. त्यानंतर आरोपी क्रमांक दोन मंजरिन रजिफ मिया याने ते पिस्तुल हातात घेतल्यावर अपघाताने ट्रिगर दाबला गेला. यातून सुटलेली गोळी विजय कुमारच्या कमरेच्या वरच्या भागात लागून तो जखमी झाला.
या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मंजरिन रजिफ मिया याला अटक करण्यात आली असून पुढील तपास वपोनि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











