- बाबा कांबळे यांची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १६ सप्टेंबर २०२५) :- महाराष्ट्र सरकारने खासगी टॅक्सी व दुचाकी कंपन्यांना मुंबई आणि पुण्यात ई-बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली असून, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत इलेक्ट्रिक दुचाकी ॲग्रीगेटर धारकांसाठी भाडे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार, पहिल्या 1.5 किमी अंतरासाठी 15 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
या निर्णयाला ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांचा तीव्र विरोध असून, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी याला “भांडवलदारांचे हित जोपासणारा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या घातक” असा निर्णय ठरवला आहे.
डॉ. कांबळे म्हणाले, “राज्यातील लाखो ऑटो-टॅक्सी चालकांच्या उदरनिर्वाहावर या निर्णयामुळे गंभीर परिणाम होणार आहेत. प्रवाशांच्या तुलनेत आधीच रिक्षा व टॅक्सींची संख्या जास्त आहे. अशा वेळी ई-बाईक टॅक्सीला परवानगी म्हणजे एका भाकरीसाठी दहा वाटेकरी.”
महाराष्ट्रात सध्या जवळपास 20 लाख ऑटो रिक्षा चालक-मालक आणि 5 लाख टॅक्सी-कॅब चालक कार्यरत आहेत. 1997 मध्ये रिक्षा परवाने बंद करण्यात आले होते; परंतु 2017 पासून परवाने पुन्हा सुरू झाल्याने पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात रिक्षांची संख्या तब्बल 1.70 लाखांपर्यंत वाढली आहे. अशा परिस्थितीत ई-बाईक टॅक्सी परवानगीमुळे बेरोजगारी वाढण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.
या निर्णयाविरोधात राज्यव्यापी बैठक बोलावून आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा डॉ. कांबळे यांनी दिला.















