- हे अभियान म्हणजे केवळ दिखावा…
- सार्वजनिक मुताऱ्यांच्या स्वच्छतेबाबत ठोस कार्यवाही का नाही?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान मोठ्या उत्साहात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. १६ दिवसांच्या या उपक्रमांतर्गत स्वच्छ रस्ते, बाजारपेठा, बसस्थानके, उद्याने, जलाशय परिसराची स्वच्छता, स्वच्छता रॅली, वेस्ट आर्ट, घरोघरी जनजागृती असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
मात्र, शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता कोणी करायची? ठेकेदार आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वयच नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमांमध्ये मुताऱ्यांच्या स्वच्छतेबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नमूद केलेली नाही.
दररोज हजारो नागरिक वापरत असलेल्या सार्वजनिक मुताऱ्यांची दुरवस्था, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. स्वच्छता ही सेवा मोहिमेत इतके नाविन्यपूर्ण उपक्रम आखले जात असताना, सर्वसामान्यांचा थेट प्रश्न असलेल्या सार्वजनिक मुताऱ्यांकडे महापालिकेने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
“स्वच्छता रॅली, वेस्ट आर्ट हे सर्व उपक्रम चांगले आहेत, पण नागरिकांच्या रोजच्या गरजा भागवणाऱ्या सार्वजनिक मुताऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्याकडे दुर्लक्ष करून हा केवळ दिखावा आहे,” अशी टीका स्थानिक नागरिक करत आहेत.
महापालिकेने गांधी जयंतीनिमित्त राबविलेल्या या अभियानाचा खरा अर्थ साधायचा असेल तर प्रथम सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीवर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांच्या स्वच्छतेविषयक कामे सर्वच प्रभागात सुरू आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत.
– मा. सचिन पवार, उपायुक्त – आरोग्य विभाग मनपा…














