न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १५ ऑक्टोबर २०२५) :- ज्ञान, विज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे थोर शास्तज्ञ, भारतरत्न,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, सुप्रसिद्ध कवी अशोक गायकवाड, महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शिक्षक जीवन ढेकळे, योगिता कोथावले, उज्ज्वला साटकर, शर्मिला काराबळे, रविंद्र ओव्हाळ, विशाल रेंगडे, सीमा जाधव, निलेश लांडगे यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थी, नागरिक यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि डिजिटल युगातही पुस्तकप्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने ‘कविसंमेलन’, ‘सोशल मीडियाद्वारे वाचनास प्रोत्साहन देणारे संदेश’, ‘मराठी वाचन कट्टा – डिजिटल वाचनाची नवी दिशा’, ‘मराठी साहित्याचे डिजिटल प्रसारण’ तसेच ‘विकिपीडियावर मराठी लेखन वाढविण्यासाठी कार्यशाळा’ असे विविध उपक्रम यानिमित्ताने पार पडले,आलेल्या मान्यवरांचे संत गाडगेबाबा यांचे जीवनावर आधारित पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
जयंती निमित्त उपस्थितांनी घेतली स्वच्छतेची शपथ…
“आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की, भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ देऊ. आम्ही भारतभूमीच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास, याप्रमाणे वर्षातील १०० तास उत्स्फूर्तपणे देऊ. आम्ही स्वतः उघड्यावर कचरा टाकणार नाही व इतरांना टाकू देणार नाही. आम्ही आमचा परिवार, आमच्या परिसरातील भाग, आमचे शहर आणि आमच्या कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहू व इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करू. आज आम्ही घेत असलेली ही प्रतिज्ञा अजून १० नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वच्छतेबाबत प्रोत्साहित करू. ते देखील भारतमातेच्या स्वच्छतेसाठी वर्षातील आपले १०० तास देतील.आम्हाला पूर्ण विश्वास आहे की स्वच्छतेसाठी आम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हे भारतमातेचे रुप अधिक स्वच्छ ठेवण्यास हातभार लावेल,” अशी स्वच्छतेची शपथ उपस्थितांनी घेतली.प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.
परीक्षा केंद्रे व ग्रंथालयांमध्ये विविध उपक्रम..
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत सर्व स्पर्धा परीक्षा केंद्रे व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी वाचन सत्र, पुस्तक प्रदर्शन तसेच प्रेरणादायी साहित्याचे वाचन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद लाभला. माजी राष्ट्रपती,भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ ‘पद्मविभूषण’ आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. तसेच त्यांना ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’, ‘व्हॉन ब्राउन पुरस्कार’, ‘रामानुजन पुरस्कार’, ‘किंग चार्ल्स II पदक’ आदी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. जगभरातील ४० हून अधिक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली. डॉ. कलाम हे एक उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी तरुणांना प्रेरणा देणारी अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी अग्निपंख, इग्नायटेड माइंड्स, इंडिया २०२०, माय जर्नी, मिशन इंडिया, इन्स्पायरिंग थॉट्स आणि ट्रान्सेंडन्स ही विशेष उल्लेखनीय पुस्तके आहेत त्यांच्या लेखनातून देशभक्ती, विज्ञाननिष्ठा आणि आत्मविश्वासाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचतो.













